शंभर वर्षांची सावली हरपली:
लातूरच्या देशपांडे गल्लीत वडाचे झाड कोसळले
लातूर/उदय वडवाले :- शहरातील जुन्या गाव भागात देशपांडे गल्लीत गुरुवारी (दि. १२ जून) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शंभर वर्षांहून अधिक जुन्या वडाच्या झाडाने अखेर आपली साथ सोडली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार वाऱ्यामुळे या वटवृक्षाच्या मुळांवर ताण आला आणि अखेर ते झाड भुईसपाट झाले.
गावभागातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये असलेले हे भलेमोठे वडाचे झाड केवळ झाड नव्हते, तर अनेकांची आठवण, सावली आणि शांततेचा आसरा होते. झाडाचे विस्तारलेले पानझाड, घनदाट छाया आणि प्रदूषणमुक्त हवेसाठी ओळखले जाणारे हे झाड स्थानिक रहिवाशांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होते.
विशेष म्हणजे या झाडाचे पूजन स्थानिक महिलांनी बुधवारीच भक्तिभावाने केले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी झाड कोसळल्याची घटना घडल्याने ग्रामस्थ भावनिक झाले आहेत.
घटनेदरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, "गावाचे वैभव" हरपल्याची भावना अनेकांच्या मनात आहे. "हे झाड आमच्या लहानपणीच्या खेळांपासून प्रत्येक सण-उत्सवाचे साक्षीदार होते. त्याच्या सावलीत अनेक आठवणी जिवंत होतात," असे भावना व्यक्त करताना अनेक नागरिकांचे डोळे पाणावले.
या झाडाचे वय सुमारे १०० वर्षांपेक्षा अधिक असल्याची माहिती या भागातील ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सतीश साळुंके यांनी दिली.