सिंदाळा सौरऊर्जा प्रकल्प पुन्हा चर्चेत
लातूर/प्रतिनिधी:गेली काही महिने थंडबस्त्यात पडलेला औसा तालुक्यातील सिंदाळा येथील सौरऊर्जा प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याने तालुका वासियांच्या आशा पल्लवीत झाल्या असून अनेक दिवसानंतर जिल्ह्यातील एखाद्या प्रकल्पासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
स्व.विलासराव देशमुख यांच्या काळात वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी या भागात ११७ हेक्टर जमीन खरेदी करण्यात आली होती. भेल आणि महाजनकोच्या सहकार्यातून हा प्रकल्प उभारण्यात येणार होता. कालांतराने प्रकल्प उभारणी बारगळली पण सरकारने ताब्यात घेतलेली जमीन मात्र कायम आहे.
दरम्यानच्या काळात राज्यात भाजपा सरकार आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी या जागेवर विविध प्रकल्प उभारण्याचा खटाटोप केला. ते प्रकल्पही उभे राहू शकले नाहीत.अनेक नेत्यांनी या जागेवर प्रकल्प उभारण्यासाठी आश्वासने दिली पण अद्याप तरी सिंदाळा येथील माळरान तसेच पडून आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनीही या जागेवर प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न चालवले होते.ते प्रयत्न अखेर फळाला आल्याचे अर्थसंकल्पातील घोषणेनंतर दिसून येत आहे.
राज्य सरकारने एकूण ५७७ मेगावॅट क्षमतेचे वीज निर्मिती प्रकल्प उभारण्याचे धोरण ठरवले आहे.सौर ऊर्जेच्या माध्यमातून ही वीज निर्मिती केली जाणार आहे. या अंतर्गतच सिंदाळा येथे ६० मेगावॅट क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे.त्यासाठी जवळपास अडीचशे कोटी रुपयांची तरतूद अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे.अनेक वर्षांच्या चर्चेनंतर सिंदाळा येथील प्रकल्पासाठी प्रत्यक्षात निधीची तरतूद झाली असल्याने औसा तालुकावासियांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
शासनाकडून प्रकल्प उभारला जाणार असल्याने अनेकांनी सिंदाळा परिसरात जमिनी खरेदी करून ठेवल्या आहेत.या प्रकल्पासाठी आवश्यक साहित्य निर्माते व पुरवठादारांचे उद्योग सुरू होऊ शकणार आहेत.इतरही अनेक कारणांनी उद्योग निर्मिती शक्य होणार आहे.हा प्रकल्प पुन्हा एकदा राजकारणात अडकू नये, तरतूद केल्याप्रमाणे निधी प्राप्त व्हावा आणि प्रकल्प उभारणी सुरू व्हावी अशीच त्या भागातील नागरिकांची अपेक्षा आहे.ती अपेक्षा फळाला आली तर औसा तालुक्यातील हा शासनाचा सर्वात मोठा प्रकल्प ठरणार आहे.