लातूरची हवा प्रदूषित ! कचरा जाळण्याचे प्रमाण वाढले धुलीकणांची संख्याही अधिक


लातूरची हवा प्रदूषित !


कचरा जाळण्याचे प्रमाण वाढले


धुलीकणांची संख्याही अधिक 


   लातूर/प्रतिनिधी:शहराचा विस्तार आणि भौतिक विकास होत असताना त्याच्या बरोबरीने प्रदूषणातही वाढ होत आहे.वेगाने होणारे औद्योगीकरण,जाळला जाणारा कचरा आणि रस्त्यावर पडलेल्या बांधकाम साहित्यामुळे प्रदूषणात भरच पडत असून संबंधित यंत्रणांची त्याकडे सोयीस्करपणे डोळेझाक होत असल्याचे दिसून येत आहे.

     एकेकाळी तालुक्याचे ठिकाण असणारे लातूर जिल्ह्याचे मुख्यालय बनले. एकामागोमाग एक विभागीय कार्यालये लातूरात आली. शिक्षणाचा लातूर पॅटर्न उदयास आला तशी शिक्षणासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली.त्यामुळे शहराचे नागरीकरण वेगाने झाले.नागरी वसाहती आणि इतर व्यवसाय वाढले,त्या तुलनेत प्रदूषण वाढू लागले आहे.

   विविध भागांमध्ये मनपाच्या घंटागाड्या जात असल्या तरी काही नागरिकांना अद्यापही कचरा घंटागाड्यातच टाकण्याची सवय लागलेली नाही.त्यामुळे कचरा रस्त्यावर फेकला जातो.काही नागरिक कचरा रस्त्यावर टाकून तो पेटवून देतात.अनेक सोसायट्या व कॉलनीमध्ये नागरिक रस्त्याच्या कडेला टाकलेला कचरा तसेच झाडांची पडलेली पाने पेटवून देतात. 

    शहरात जागोजागी पानटपऱ्या आहेत.टपरी चालक सुपारीचे कागद एकत्र करून पेटवून देतात.यामुळे शहरात धुराचे लोट पसरत असल्याचे दिसून येते.कचरा जमा करण्यासाठी घंटागाड्या असल्या तरी दुकान उघडल्यानंतर घंटागाड्यांची वाट न पाहताच तो जाळला जात असल्याचे दिसून येते. या कचऱ्यामध्ये प्लास्टिक व रबराचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हवा प्रदूषित करणारे घटक पसरत जातात.

   शहरातील मुख्य रस्ते, विविध सोसायट्या यासह दयानंद महाविद्यालय ते खाडगाव रोड,पीव्हीआर चौक ते औसा रोड,

एमआयडीसी,रिंगरोड वरील गॅरेज लाईन या भागात सर्रास हे चित्र दिसून येते.त्यामुळे नागरिकांना जाग कधी येणार ?असा प्रश्न उपस्थित होत आहे.

  वाढणाऱ्या प्रदूषणाला कचरा जाळणारे,घरातील कचरा रस्त्यावर टाकणारे जसे जबाबदार आहेत तसेच बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकणारे नागरिक व बांधकाम व्यावसायिकही जबाबदार आहेत.अनेक ठिकाणी बांधकाम करत असताना त्यासाठी आवश्यक असणारे वाळू,खडी,दगड- विटा असे साहित्य रस्त्यावरच टाकले जाते.त्यावरून वाहने धावत असतात.यामुळे धूलिकण हवेत मोठ्या प्रमाणात पसरत जातात. हवेतील प्रदूषण वाढत असल्याने विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे.जी हवा सामान्य नागरिकांना मिळते तीच अधिकाऱ्यांनाही श्वसनासाठी घ्यावी लागत असते.असे असतानाही प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्या मंडळींकडून या प्रकारांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते.शहराला प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रत्येकाला याची समज येणे आवश्यक असून त्यासाठी जाणीव जागृती करणे गरजेचे बनले आहे.

Comments