**
ज्यांच्या घरात आज वयस्कर माणसं आहेत त्यांच्या एवढं भाग्यवान कोणी नाही असं म्हटलं तर वावग ठरू नये, Old is Gold किंवा जुनं ते सोनं ही म्हण काय उगीच प्रसिद्ध नाही.
आजची पिढी खूप हुशार आहे असं म्हणतात पण अनुभवा पुढे हुशारी चालत नाही हे निर्विवाद सत्य आहे, अनुभव हा क्षणात मिळत नाही तो मिळवण्यासाठी कित्येक कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागते, स्वातंत्र्य संग्राम अनुभवलेली ही जेष्ठ पिढी, गुलामगिरीचे चटके खाल्लेले, गरिबीचे हाल सोसलेले, अत्यंत बिकट परिस्थितीतून मार्ग काढलेले, अर्थासाठी कधीही अनर्थ न करणारे असे हे देवमाणस आणि आजकालच्या पिढीला ही अडगळ झालेली आपणास पहावयास मिळते, आज वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे यावरूनच हे स्पष्ट होतेय, आजच्या पिढीला यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही म्हणून त्यांना वृद्धाश्रमात टाकण्यात येते हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
खरं म्हणजे अशा देव माणसांची घरात पूजा करण्याऐवजी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते, त्यांचे महत्त्व समजून घेतले जात नाही, त्यांचा कोणत्याही बाबतीत सल्ला घेतला जात नाही, खरं म्हणजे आपल्या घरातील हे भक्कम आधारवृक्ष आहेत, त्यांचा अनुभव हा अनमोल आहे, आज गुगलवर आपण सर्व सर्च करू शकतो पण आईची माया, आजोबा-आजींचं प्रेम आपल्याला तेथे मिळणे शक्य नाही. निस्वार्थीपणे आपल्या अनुभवाचा मोफत सल्ला देणारी ही शेवटची पिढी, त्यामुळे कोणत्याही वृद्ध, वयस्कर व्यक्तींचा आदर केला पाहिजे, त्यांची सेवा करायला पाहिजे, त्यांच्या मदतीसाठी धावून जायची तयारी पाहिजे, प्रत्येकाने आपल्या घरातील वयस्कर व्यक्तींना खूप जपलं पाहिजे, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, घरातील प्रत्येक निर्णयात प्रथम त्यांचे मत विचारात घ्यायला पाहिजे, ते आनंदात राहिले तर घरात स्वर्ग साकारल्याशिवाय राहणार नाही याचा प्रत्यय तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. आज आपल्या घरात आपण त्यांची काळजी घेतली तर उद्या तुमच्या म्हातारपणी तुमची मुलं, नातवंड तुमची काळजी घेतील हे विसरू नये.
*अभिवादनशिलस्य नित्यं वृद्धोपसेविन: l*
*चत्वारी तस्य वर्धंते आयुर्विद्या यशोबलं ll*
मोठयांचा जे आदर करतात आणि जे सदैव मोठयांची सेवा करतात त्यांची आयु, विद्या, यश आणि शक्ती सदैव वृद्धिंगत होते.
*-संजय व्यापारी*
*@7743918559*